मुसळधार पावसाने उत्सवाच्या आनंदावर फेरले पाणी, व्यापाऱ्यांचे झाले नुकसान; अनेकांना पडता येईना घराबाहेर !!

Foto
उज्ज्वला साळुंके

छत्रपती संभाजीनगर: यावर्षी सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय नागरिकांना देखील त्यामुळे हैराण व्हावे लागले आहे. इतकेच नव्हे तर यंदा गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या आनंदावर पाणी फेरले आहे. अनेकांना घराबाहेर पडणेही शक्य होत नाही. त्याचा परिणाम व्यापारीवर्गाचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरातही पाणी शिरले आहे. पावसामुळे सगळीकडे नुकसानच नुकसान झाले आहे.

यंदा पावसाने सर्वत्र नुसता धुमाकूळ घातला आहे. नागरिकांचे त्यामुळे प्रचंड हाल झाले आहे. कुठे घरात पाणी शिरले आहे. तर कुणाला घराबाहेर पडता येईना अशी परिस्थिती सध्या आहे. अशातच यंदा उत्सवाच्या आनंदावर देखील पावसाने पाणी फेरले आहे. त्यात यात्रा उत्सवाच्या व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा गणेशोत्सव काळात मोठ्या मेहनतीने अनेकांनी गणेश मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम घेतले. त्यात अनेकांनी महिना महिना मेहनत करून देखावे साकारले. मात्र त्यात पावसाने हजेरी लावली आणि देखावे पाहण्यासाठी अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. इतकंच नव्हे तर सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. अशातच अनेकांनी दांडिया उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यावरही पावसाने पाणी फेरले आहे. अनेकांनी दांडिया खेळण्याचा पावसात आनंद घेतला तर अनेकांना दांडिया उत्सवात जाता आले नाही. तसेच नवरात्र उत्सवानिमित्ताने देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना त्यात पावसाने हजेरी लावली आणि संपूर्ण उत्सवावर पाणी फेरले. अनेकांना दर्शनासाठी जाता येत नाही.

व्यापारीवर्गाचे नुकसान

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी यात्रा भरविण्यात आल्या आहे. त्यात शहरातील कर्णपुरा यात्रा तसेच ग्रामीण भागातील विविध देवीच्या मंदिर परिसर गजबजलेला आहे. हर्सूल परिसरातही लहान लहान दुकाने थाटले आहेत. याशिवाय यात्रेत विविध ठिकाणच्या मंदिर परिसरात फुल, नारळ विक्रेते,  फेरीवाले, फुगे विक्रेते, खेळण्या विक्रेते यासह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी यात्रेत आपले दुकाने थाटले आहेत. मात्र यंदा पावसाने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. यंदा दहा टक्के देखील व्यवसाय झाला नसल्याची खंतही लहान लहान व्यापारीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. एकतर अनेकांना नवरात्र आणि गणेशोत्सव काळातच व्यवसाय होतो. त्यातही यंदा पावसाने धुमाकूळ घातला आणि त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. त्यात फेरीवाल्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

पावसाने मोठे नुकसान झाले: भूषण जाधव

दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेत जाऊन चांगला व्यवसाय होईल. असे वाटले होते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही यात्रेत येऊन पाव भाजीचा स्टॉल लावला. चांगला उत्साह होता. परंतु पहिल्या माळेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि संपूर्ण व्यवसायावर पाणी फेरले. अजूनही पाऊस आहे तसाच आहे. यंदा केवळ दहा टक्के व्यवसाय झाला. यंदा या पावसाने मोठे नुकसान झाले असल्याची खंत विक्रेते यात्रेतील पावभाजी स्टॉलधारक भूषण जाधव यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना व्यक्त केली.